
बेळगाव : बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाच्या धर्तीवर चोऱ्या करून मौजमजा करणाऱ्या एका कुप्रसिद्ध घरफोडी करणाऱ्या चोराला अखेर यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलीस पथकाने सोने, चांदीचे दागिने, रोकड आणि वाहनांसह एकूण ९७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाप्रमाणे चोरी करून मौजमजा करणाऱ्या एका कुप्रसिद्ध घरफोडी करणाऱ्याला अटक करून त्याच्याकडून सोने, चांदीचे दागिने, रोकड तसेच वाहनांसह एकूण ९७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बेळगाव येथे आज पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. १६-१०-२०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते २२-१०-२०२५ रोजी सकाळी ७:०० दरम्यान यमकनमर्डी गावात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि तिजोरीचे दरवाजे तोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर एस. गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद एफ. मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने आपली मोहीम पुढे नेत सुरेश मारुती नाईक सनदी नामक आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले. त्याच्याकडून १,२८० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८.५ किलो चांदीचे दागिने, १,२५,००० रुपये रोख रक्कम, १ थार वाहन आणि २ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याची कसून चौकशी केली असता, या आरोपीचा यापूर्वीही अनेक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये यमकनमर्डी येथे ७० ग्रॅम सोने, १७० ग्रॅम चांदी आणि ₹२२,००० रोख रक्कम चोरी, मनगुत्ती येथे २३ ग्रॅम १ मिली सोने, चांदीचे दागिने आणि ₹८,५०० रोख रक्कम चोरी, तसेच संकेश्वर येथे चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. या पथकाने वैज्ञानिक तपास पद्धतींचा वापर करून आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यात सहभागी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta