
बेळगाव : दोन वर्षांपासून अतिवाड गावाला अनियमित बस सेवा असल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजसाठी ये-जा करणे कठीण झाले आहे. अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी परिवहन विभागा विरोधात मोर्चा काढत रास्तारोको केले. यादरम्यान परिवहन विभागाच्या प्रतिनिधींना जाब विचारल्यानंतर गावात शौचालयाची सुविधा नसल्याने बस चालक नियमित सेवा देत नसल्याचे उत्तर परिवहन खात्याकडून देण्यात आले. अपुरी बस सेवा व अनियमित बसच्या फेऱ्या यामुळे विद्यार्थ्यांसह अतिवाड गावच्या ग्रामस्थांची देखील गैरसोय होत आहे. परिवहन विभागाने गावात पाणी आणि शौचालयाचा अभाव असल्यामुळे बस सेवा अनियमित सुरू असल्याचे कारण सांगितले असले तरी देखील ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, गावात पाणी व शौचालयाची व्यवस्थित सोय आहे. ग्रामपंचायतने सार्वजनिक शौचालयासाठी निधीदेखील मंजूर केला आहे परंतु परिवहन मंडळ आपली अकार्यक्षमता लपवत निव्वळ कारणे देत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. अतिवाड गावात वेळेवर बस सेवा सुरू न झाल्यास उचगाव रस्ता बंद करण्याचा इशारा वेंकटेश हेब्बाळकर यांनी दिला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या बेकिनकेरे येथील विद्यार्थिनीने सांगितले की, अपुऱ्या व अनियमित सेवेमुळे या भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे शाळा महाविद्यालयांना जाणाऱ्या त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिवहन विभागाकडे वारंवार निवेदने देऊन देखील कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आज रास्ता रोको केला. यावेळी आंदोलन आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नियमित बस सेवा सुरू झाली नाही तर उद्यापासून उचगाव रस्ता बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta