
उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर होणार चर्चा
बेळगाव : 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली असून अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन नियोजनासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना अधिवेशनाबाबतच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. अधिवेशनाचे काम पाहण्यासाठी येणाऱ्या जनतेला सर्व सुविधा पुरविल्या जातील तसेच 500 विद्यार्थ्यांना कामकाज पाहण्याची परवानगी दिली जाईल परंतु कामकाज पाहण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी असणे अनिवार्य आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, सुवर्णसौध येथे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या 30 विद्यार्थ्यांना संपूर्ण सत्राचा अभ्यास करण्याची परवानगी दिली जाईल. सत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा वर्ग दिले जातील. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रस असेल त्या क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
अधिवेशनाच्या पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी उत्तर कर्नाटकाच्या समस्येवर चर्चा करण्यात येणार आहे. जर आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या समस्येबद्दल सरकारला प्रश्न विचारले तर सरकारशी चर्चा करून त्यावर उत्तर देईल असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विधानपरिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी, विधानसभेचे उपाध्यक्ष रुद्राप्पा लमानी, बेळगाव उत्तरचे आमदार असिफ शेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासोबत इतर अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta