
बेळगाव : बेळगाव शहर तसेच परिसरात घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी काल गुरुवारी एका अट्टल दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्या जवळून लाखो रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजित वसंतराव बजंत्री (वय १९) राहणार अळणावर या तरुणाला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सदर तरुण गुरुवारी चोरलेल्या मोटरसायकलवरून जात असताना त्याच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या. त्यामुळे हिरेबागेवाडी पोलिसांनी अडवून चौकशी केली असता तरुणाने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच हिरेबागेवाडी, धारवाड, अळणावर, तसेच कित्तूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अजय हा गवंडी कामगार आहे. हिरेबागेवाडी पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ जवळपास २ लाख ७० हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून हिरो स्प्लेंडर प्लस क्र. केए २२ ईके ४०७८, हिरो होंडा एच.एफ. डीलक्स क्र.केए २५ ईएम ८०५३, बजाज डिस्कवर क्र.केए २६ एल ७७३५, आणि हिरो स्प्लेंडर प्लस क्र.केए २४ क्यू ५९६८ अशा एकूण चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बेळगाव ग्रामीणचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., उपनिरीक्षक बी.के. मिटगार, पोलीस एम. आय. तुरमुरी, गुरु सिद्धाप्पा पुजारी, एम. जी. माणिकबार, महांतेश कडन्नवर, आर. आर. केळगीमणी आदींनी सदर कारवाई केली असून याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस तालुका गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta