
बेळगाव : आपलं संपूर्ण आयुष्य सीमा लढ्यासाठी समर्पित करणारे सीमा तपस्वी, सीमा सत्याग्रही रामा शिंदोळकर यांना काल रात्री देवाज्ञा झाली. सीमा लढ्यात नेहमी अग्रभागी असणाऱ्या या योद्धाने अखेरचा “जय महाराष्ट्र” म्हणत सीमावासीयांचा अखेरचा निरोप घेतला.
त्यांचा सीमा लढ्यातील प्रवास कधीही न थकणारा व थक्क करणारा असा होता. आजपर्यंत झालेल्या प्रत्येक आंदोलनात, मोर्चे, उपोषणात रामा शिंदोळकर मामा हे अग्रभागी असायचे. परिस्थिती बेताची असून देखील मुंबईपर्यंत झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग अग्रभागी होता. सीमाप्रश्नी मध्यवर्तीने पुकारलेले आंदोलन असो किंवा युवकांनी पुकारलेले आंदोलन हा लढवय्या प्रत्येक लढ्यात अग्रभागी असायचे. 2018 साली युवा समितीचे पहिलं आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानावर झाले होते त्यावेळी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी युवकांसोबत हीरीरीने भाग घेणारा ऐंशी वर्षाचा तरुण योद्धा म्हणजे रामा शिंदोळकर हे होते. तरुण वर्गाला लाजवेल असा त्यांचा सहभाग आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. सीमा प्रश्न सोडवणुकीचा अधुरं स्वप्न पुढील पिढीला सोपवून रामा शिंदोळकर मामानी अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत सीमावासीयांचा निरोप घेतला.
सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत रामा शिंदोळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती समितीसह घटक समित्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मंगळवारी सायंकाळी येथे म. ए समिती शिवसेनेच्या वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta