

रामदुर्ग : मुलगी झाल्याच्या रागेतून आईनेच आपल्या तीन दिवसाच्या नवजात शिशूचा गळा दाबून खून केल्याची संतापजनक घटना रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात मंगळवारी उघडकीस आली आहे. अश्विनी हळकट्टी (२८) असे निर्दयी बाळंतिणीचे नाव आहे. यापूर्वी तिला तीन मुली झाल्या होत्या, त्यामुळे ती मुलाच्या प्रतीक्षेत होती. २३ नोव्हेंबर रोजी मुदकवी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रसूती झाली होती. दुसऱ्या दिवशी ही माता आपल्या माहेरी हिरेमलंगी येथे आली होती. आज सकाळी घरातील लोक बाहेर गेले असताना, अश्विनीने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला मूल श्वास घेत नसल्याचा बनाव रचला.
रामदुर्गचे टीएचओ नवीन निजगुलि यांनी या घटनेबद्दल अधिक माहिती दिली. “माझी मुलगी श्वास घेत नाहीये,” असे नाटक करत मातेने बाळाला रामदुर्ग शासकीय रुग्णालयात आणले असता, ही घटना उघडकीस आली. डॉक्टरांनी तपासणी करून, गळा दाबल्यामुळे श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलीस सदर महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून रामदुर्ग डीवायएसपी चिदंबर मडिवाळर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ही घटना सुरेबान पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta