Monday , December 8 2025
Breaking News

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये वाढवावीत. आपले निश्चित ध्येय गाठून मोठे यश मिळवावे आणि इतरांना रोजगार देण्याइतके मोठे व्हावे. राष्ट्रनिर्माणासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १४वा वार्षिक दीक्षांत समारंभ बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे पार पडला. राणी चन्नम्मा विद्यापीठाने गेल्या १८ महिन्यांत तीन दीक्षांत समारंभ आयोजित केले आहेत. पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर केवळ ५० दिवसांत दीक्षांत समारंभ आयोजित करणारे हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी भूषवले, तर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि सह-कुलगुरू डॉ. एम. सी. सुधाकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी.एम. त्यागराज आणि जी.एम. मोदी विज्ञान पुरस्कार विजेते तसेच इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए.एस. किरणकुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या १४व्या दीक्षांत समारंभात पर्यावरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिवाजीराव छत्रू कागणीकर यांना; शिक्षण, समाजसेवा आणि वारसा जतन क्षेत्रात विनोद सुरेंद्र दोड्डण्णवर यांना; तसेच साहित्य आणि समाजसेवा क्षेत्रात बसवराज येलीगार यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.यावेळी विद्यापीठाचे एकूण ३८,४१५ विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी पात्र ठरले. १२५ विद्यार्थ्यांनी रँक मिळवली असून, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ३९ सुवर्णपदके, ०४ विषयवार अग्रगण्य रँक आणि दोन विद्यार्थ्यांना एक रोख बक्षीस, तसेच २८ जणांना पीएच.डी. पदवी देण्यात आली.

यावेळी बोलताना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रनिर्माणासाठी योगदानाची अपेक्षा व्यक्त केली. “आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये वाढवावीत. आपले निश्चित ध्येय गाठून मोठे यश मिळवावे आणि इतरांना रोजगार देण्याइतके मोठे व्हावे. राष्ट्रासाठी योगदान देण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले.

बेळगावचे ‘अण्णा हजारे’ म्हणून ख्यातनाम शिवाजी कागणीकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. हा सन्मान पाहून त्यांनी आनंदही व्यक्त केला शिवाय देशातील गंभीर समस्यांवर खंतही व्यक्त केली. ते म्हणाले की, स्वराज्याला ७६ वर्षे झाली तरी समस्या सुटल्या नाहीत. देशातील ७० टक्के लोक आजही खेड्यांमध्ये शेती आणि मोलमजुरीवर अवलंबून आहेत. कष्ट करून अन्न देणाऱ्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव संतोष कामगौडा, मूल्यमापन विभागाचे कुलसचिव प्रा. डी. एन. पाटील, वित्त अधिकारी एम.ए. स्वप्ना, प्रा. कमलाक्षी तडसद आणि प्रा. अशोक डिसोजा यांच्यासह इतरांनी दीक्षांत समारंभ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांच्यासह विविध मान्यवर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *