

बेळगाव : बेळगाव शहरात सुसज्ज प्रेस इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९.९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात या इमारतीचे उद्घाटन होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.
मंगळवारी (२५ नोव्हेंबर) वार्ता भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांकडून सत्कार स्वीकारताना ते बोलत होते. यावेळी जारकीहोळी पुढे बोलताना म्हणाले, पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी अनेक दशकांपासून प्रयत्न केले जात होते, परंतु ते शक्य झाले नाही. आमच्या कार्यकाळात या कामाला आता मंजुरी मिळाली आहे, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
रायबाग आणि गोकाकसह इतर तालुक्यांमध्ये बार असोसिएशनसाठी इमारत बांधण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लोळसूर आणि खानापूर पुलांसह राज्याच्या विविध भागात पूल बांधण्यासाठी २००० कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सरकारने विभागाला दिलेल्या अनुदानातून विविध विकास कामे केली जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार ऋषिकेश बहादूर देसाई म्हणाले, बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे आणि सर्व पत्रकारांनी पत्रकार भवनाचा चांगला वापर करून एकत्रितपणे पुढे जावे. भविष्यातील तांत्रिक कौशल्ये विकसित करावीत, असे ही ते म्हणाले.
पत्रकार मेहबूब मकानदार म्हणाले, अनेक सरकारे येऊनही पत्रकार भवनाचे बांधकाम होऊ शकले नाही. पत्रकार भवन बांधकामासाठी मिळालेले अनुदान थोडे उशिरा झाले असले तरी जिल्ह्यातील पत्रकारांच्या अपेक्षांपेक्षा जास्त आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. या कमी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रयत्न कामे आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबुर बोलताना म्हणाले, राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगावमध्ये सुसज्ज पत्रकार भवन बांधणे हे माध्यम प्रतिनिधींचे दीर्घकाळचे स्वप्न होते. यासाठी जमिनीची समस्या, निधीचा अभाव अशा काही कारणांमुळे भवन बांधण्यात विलंब झाला असला तरी आता ते स्वप्न पूर्ण होत आहे. मी बेळगावच्या सर्व माध्यम प्रतिनिधींच्या वतीने मी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अभिनंदन करू इच्छितो, असे ही कडबुर म्हणाले.
विविध वृत्तपत्रांचे संपादक, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वरिष्ठ पत्रकार, पत्रकार, छायाचित्रकार आणि माहिती विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta