
रामदुर्ग : अनैतिक संबांधाच्या पार्श्वभूमीतून धर्मांतरासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोणगनूर गावात घडली आहे. नागव्वा देमप्पा वंटमूरी (२८) ही महिला शुक्रवारी आपल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आली. नागव्वा यांचे लग्न होऊन नऊ वर्षे झाली होती. लग्नाच्या एका वर्षानंतर मक्तुमसाब पाटील नावाच्या व्यक्तीशी तिची ओळख झाली आणि त्यांचे अनैतिक संबंध जुळले होते. कुटुंबातील सदस्यांनी समजावून सांगितल्यानंतर नागव्वा यांनी मक्तुमसाब सोबतचे संबंध तोडले होते. तरीही, मक्तुमसाब नागव्वा यांच्या घरी जाऊन, धर्मांतरासाठी दबाव आणून जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.सदर महिलेला अनेक विषयांवरून त्रास दिला जात होता. मुक्तुमसाबच्या छळामुळेच तिचा मृत्यू झाला असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यानेच तिचा खून केला असावा, अशी आम्हाला शंका आहे. अशा शब्दांत युवतीचे नातेवाईक हनुमंत यांनी संशय व्यक्त केला. मृत महिलेचे वडील यल्लप्पा तळवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, पतीच्या माघारी मक्तुमसाब हा घरी येऊन आपल्या मुलीला त्रास देत असे. त्या आम्ही अनेकवेळा समजावून सांगितले होते. परंतु त्याने जीवे मारण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव आणला होता. या जाचातून आपल्या मुलीने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे, असा आरोप त्यांनी केला.
या घटनेबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले, “वैयक्तिक प्रकरण घरात समजल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी मुक्तुमसाबला ताकीद दिली होती. मात्र सततच्या धाकाने महिलेने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत असून रामदुर्गचे डीएसपी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करून तपास हाती घेण्यात आला आहे. या प्रकरणी कोणतीही ‘डेथ नोट’ मिळालेली नाही. काही लोक विनाकारण जातीय सलोख्याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
ही घटना कटकोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच कटकोळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह बिम्स रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला असून मक्तुमसाब पाटीलविरुद्ध छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली कुटुंबीयांच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta