
बेळगाव : 2004 साली महाराष्ट्र शासनाने सीमाप्रश्नी खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाव वर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून बेळगावात हिवाळी अधिवेशन भरण्याचा कुटील डाव रचला होता. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अशाप्रकारे अधिवेशन हे लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य कृत्य आहे तरी देखील कर्नाटक सरकारने बेळगावात सुवर्णसौध उभारून दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरवतात. या अधिवेशनाचा निषेध करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रतिकात्मक महामेळावे आयोजित करून ते यशस्वी देखील केले. पण अलीकडे काही कन्नड संघटनांच्या विरोधी भूमिकेमुळे प्रशासनाने मेळाव्यात अडकाठी आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यावर्षी 8 डिसेंबर पासून अधिवेशन सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी माणसांचा महामेळावा व्हॅक्सिन डेपो टिळकवाडी बेळगाव येथे सकाळी ठीक 11 वाजता आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मराठी भाषिक जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहून आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. मेळावा अत्यंत शांततापूर्ण वातावरणात वेळेवर सुरुवात होईल याची खबरदारी घेऊन कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta