
बेळगाव : बेळगावात उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्यभरातून सुमारे 4000 पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. 8 डिसेंबर पासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुवर्णसौधमध्ये होणारे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी धारवाड, बागलकोट, उडपी, पीटीएस प्रशिक्षण केंद्र अशा विविध ठिकाणाहून सुमारे 4000 पोलीस अधिकारी व कर्मचारी बेळगाव दाखल झाले आहे. आज बेळगाव पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी दाखल झालेल्या जवानांना पोलीस कवायत मैदानावर मार्गदर्शन केले. सर्व जवान सुवर्णसौध आणि बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणार आहेत.
बंदोबस्तासाठी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना शहर पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की, बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व जवानांची सेक्टर्स स्तरावर नेमणूक करण्यात आली आहे. व्हाट्सअपद्वारे कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती पुरविण्यात येईल. बंदोबस्तासाठी असलेल्या जवानांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये अंघोळीसाठी गरम पाणी, भोजन व्यवस्था त्याचप्रमाणे थंडीसाठी बचाव करण्यासाठी ब्लँकेट्सचा पुरवठा देखील करण्यात आला आहे. बंदोबस्तात डिजिटल हजेरीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचे ठिकाण नोंद करण्यात आले आहे. कोणतीही अडचण आल्यास तात्काळ पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. उत्तर कर्नाटकातील समस्यांवर लक्ष केंद्रित करत उत्तर कर्नाटकाचा विकास साधण्याच्या उद्देशाने बेळगाव हे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात येते ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. यावेळी राज्यभरातून पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta