
बेळगाव : बेळगाव वर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून बेळगावात कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना देखील कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगावात सुवर्णसौध उभारून दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविले जाते. अशाप्रकारे अधिवेशन भरविणे हे लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य कृत्य आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीचा निषेध करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रतिकात्मक मेळाव्याचे आयोजन करून ते यशस्वी देखील केले होते, परंतु मागील तीन वर्षात कर्नाटक सरकारने पोलिसी बाळाचा वापर करत महामेळावा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यावर्षी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला प्रशासनाने तोंडी परवानगी दिली आहे. हे मराठी भाषिकांमध्ये एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समिती कार्यकर्त्यांनी यापूर्वीच मेळाव्याची जनजागृती केली आहे. गावोगावी, गल्ली, चौकात समिती कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून बेळगावसह बेळगाव तालुका व खानापूर तालुक्यात महामेळाव्याची जनजागृती केली आहे. प्रशासनाने व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा करण्यास तोंडी परवानगी दिली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून व्हॅक्सिन डेपो परिसरात बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत. मेळाव्याच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता उद्या सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी व्हॅक्सिन डेपोवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta