
बेळगाव : आज रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे समितीने त्यांनी रीतसर परवानगी मागितली होती काल रविवारी समिती पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने तोंडी परवानगी दिली होती, परंतु रात्रीपासूनच पोलिसांच्या दुटप्पीपणाला सुरुवात झाली होती. वॅक्सिन डेपोवर आयोजित महामेळाव्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून रात्री रस्ते अडविण्याचे काम प्रशासनाने सुरू केलेच होते तर आज सकाळी खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे.

त्यामध्ये खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून खानापूर पोलीस स्थानकात त्यांना ठेवण्यात आले आहे. संविधानाच्या मार्गातून आपला निषेध व्यक्त करू पाहणाऱ्या मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार वेळोवेळी गळचेपी करीत असते प्रशासनाच्या या धोरणाचा मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta