




बेळगाव : पहाटेपासून अटकसत्र सुरू करून महामेळावा उधळून लावण्याचे कर्नाटकी प्रयत्न हाणून पाडत चक्क ए.पी.एम.सी. मार्केटमध्येच महामेळावा पार पडला. या महामेळाव्याचे अध्यक्षस्थान निडगलचे जेष्ठ सीमा सत्याग्रही शंकरराव पाटील यांनी भूषविले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी ए.पी.एम.सी. परिसर दणाणून गेला होता.
काल जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती म. ए. समितीला मेळावा घेण्यास परवानगी देऊन व्हॅक्सीन डेपो मैदान हे स्थळ निश्चित केले होते. परंतु, आज सोमवारी (ता.८) पोलिसांनी महामेळाव्याला जाण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांना अटक करून विविध ठिकाणी स्थानबध्द केले. बेळगाव येथील ए.पी.एम.सी. मार्केटच्या सभागृहात अनेकांना स्थानबध्द करण्यात आले होते. यावेळी तेथेच महामेळावा घेण्याचे निश्चित करून कर्नाटक शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी रणजित पाटील, ॲड.अमर यळ्ळूरकर, माजी जि. पं. सदस्य विलास बेळगांवकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, प्रकाश अष्टेकर, कमल मन्नोळकर, सतीश पाटील (येळ्ळूर), शुभम शेळके, विनायक पाटील (कर्ले), युवा नेते आर. एम. चौगुले, माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर, यल्लाप्पा रेमाणाचे, नेताजी जाधव, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी भाषणे करून निषेध नोंदविला.
तीन ठराव पारित
भाषावार प्रांत रचना करतांना अन्याय झालेल्या मराठी भाषिकांना भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्यता आणि लोकेच्हा या आधारे महाराष्ट्रात समावेश करावा
भाषिक अल्पसंख्याकांचे न्याय अधिकार मराठी भाषिकांना त्वरित मिळावेत.
आपल्या न्याय हक्कांसाठी शांतताप्रिय मार्गाने लढणार्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर घातलेले खटले त्वरित रद्द करावेत. ठरावांचे वाचन मालोजीराव अष्टेकर यांनी केले. यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात ठराव समंत करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta