
बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी सुवर्णसौधला घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नुकसानभरपाईतील विलंबाबद्दल भाजप नेते आर. अशोक आणि बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारला धारेवर धरले.
९ डिसेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मालिनी सिटी येथील भाजपच्या आंदोलनाच्या ठिकाणाची पाहणी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी राज्य सरकारवर शेतकरी वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पीक नुकसान होऊनही शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई जाहीर न करणे निंदनीय आहे. मुख्यमंत्री केवळ हवाई पाहणीपुरते मर्यादित राहिले आहेत, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी ते पुढे आले नाहीत. या सरकारने जबाबदारी सोडली असून, प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करत आहे. ‘आंधळ्यासारखे पाहत आणि बहिऱ्यासारखे ऐकत’ असलेल्या या सरकारच्या विरोधात उद्या सर्व जिल्ह्यांतून सुमारे २० ते २५ हजार शेतकरी एकत्र येऊन सुवर्णसौधला घेराव घालणार आहेत. १३८ आमदारांचे बहुमत असूनही शेतकऱ्यांसाठी खजिन्यात पैसे नाहीत का? हा पैसा कुठे जात आहे? असा खडा सवाल बी. वाय. विजयेंद्र यांनी केला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी टीका केली की, राज्यात काँग्रेस सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली तरी शेतकऱ्यांचे हित जपण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये कर्नाटक आज देशात दुसऱ्या स्थानावर आहे. सुमारे २,४०० अन्नदात्यांनी आत्महत्या केल्या असूनही सरकारला याची जबाबदारी नाही. काँग्रेस नेत्यांना सत्तेची नशा चढली असून, शेतकऱ्यांचे दुःख ऐकण्याऐवजी ते ‘अल्पोपाहाराच्या’ मौजमजेत मग्न आहेत. “राज्याचा खजिना रिकामा झाला आहे, पण काँग्रेसचे नेते मात्र मजा करत चैनीत आहेत.” शेतकऱ्यांसाठी लढायला या, अन्यथा जागा खाली करा. भाजप कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि आम्ही या संदर्भात सभागृहात स्थगन प्रस्ताव आधीच मांडला आहे, असा संताप आर. अशोक यांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta