
शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार
कागवाड : शिवानंद महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांनी एकाच वर्षात भारतीय सैन्यात प्रवेश करून महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे. “एनसीसी ही भारतीय सैन्य तयार करण्याची पवित्र प्रक्रिया असून देशसेवेची ही सर्वोच्च संधी आहे. आज देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज आहे,” असे प्रतिपादन नायब सुभेदार सुभाष भट्ट यांनी केले.

महाविद्यालयातील एनसीसी विभाग आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत सत्कार समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.पी. तळवार होते. व्यासपीठावर हवालदार रणजित बडेकर, निवृत्त सुभेदार चिदानंद कुंभार, संस्थेचे सचिव बी.ए. पाटील, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आलगोंडी, प्राचार्य पी.बी. नंदयाळे, प्रा. जे.के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीताने झाली. स्वागत लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. जे.के. पाटील यांनी केले.
२६ कर्नाटक बटालियन बेळगावचे हवालदार रणजित बडेकर म्हणाले की, “अग्निवीर निवड प्रक्रियेत शिवानंद कॉलेजचे विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत असून, एनसीसीमध्ये मिळणारे प्रशिक्षण त्यांना सैन्यात मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत आहे.”
लक्ष करिअर अकादमी मंगसुळीचे संस्थापक, निवृत्त सुभेदार चिदानंद कुंभार यांनी सांगितले की, “शिवानंद महाविद्यालयातील एनसीसी हे वैशिष्ट्यपूर्ण असून तरुणांमध्ये देशप्रेम जागृत करण्यात हे महाविद्यालय अग्रेसर आहे.”
लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी ३० विद्यार्थी ‘अग्निवीर’मध्ये निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. तळवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
भारतीय सैन्यात भरती होऊन ट्रेनिंग पूर्ण केलेल्या तसेच नुकतेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि एनसीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली फडतरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विशाल बूर्ली यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta