
बेळगाव : टिपू सुलतान जयंती साजरी करण्याऐवजी अब्दुल कलाम जयंती साजरी करावी. हिंदूविरोधी, कन्नडविरोधी आणि देशविरोधी टिपू जयंतीची आम्हाला गरज नाही, असे श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक म्हणाले.
आजच्या अधिवेशनात आमदार अशोक यांनी टिपू सुलतान जयंती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली. मुतालिक यांनी या मागणीचा तीव्र निषेध केला. “हा केवळ अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याचा प्रकार असून, श्रीराम सेना याचा निषेध करते. राज्य काँग्रेस सरकार दुसऱ्या समाजापुढे झुकत आहे. तसेच, गोहत्याबंदी कायद्यात सुधारणा करून ते गोहत्येला प्रोत्साहन देत आहे,” असा आरोप त्यांनी केला. हिंदूविरोधी, कन्नडविरोधी आणि देशविरोधी असलेल्या टिपू जयंतीचे आपल्या राज्यात कशासाठी आयोजन करायचे? त्याऐवजी, अब्दुल कलाम जयंती साजरी करा. देशात अनेक देशभक्त आहेत, त्यांची जयंती साजरी करा. इस्लाम धर्मात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीव्यतिरिक्त इतर कोणतीही जयंती साजरी करण्याची परवानगी नाही. टिपू जयंती साजरी करून मतांधता डोक्यात गेलेल्या काँग्रेस सरकारने इस्लाम धर्माचा द्रोह केला आहे, असे ते म्हणाले. जर सरकारने टिपू जयंतीला परवानगी दिली, तर संपूर्ण राज्यात उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मुतालिक यांनी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta