
बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या काळ्या यादीत अर्थात रावडी शीटमध्ये नांव नोंदवलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानचे युवा कार्यकर्ते राजेंद्र बैलूर यांच्यावरील संबंधित गुन्हे तीन महिन्याच्या आत मागे घेण्यात यावेत, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने बजावला आहे.
बेळगाव शहर परिसरात धडाडीचे युवा कार्यकर्ते राजेंद्र बैलूर हे हिंदुत्ववादी कार्यात नेहमी आघाडीवर असतात. आपले हे कार्य कायद्याच्या चौकटीत करण्याबरोबरच जनहितार्थ काम करणाऱ्या बैलूर यांच्यावर अलीकडच्या काळात पोलिसांकडून खोटे-नाटे गुन्हे नोंदविण्यात आले होते.
एवढे करून न थांबता पोलिसांनी त्यांचा थेट समाजविघातक कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांच्या काळ्या यादीत अर्थात रावडी शीटमध्ये समावेश केला होता. पोलीस प्रशासनाने आपल्यावर केलेल्या या अन्यायाच्या विरोधात राजेंद्र बैलूर यांनी न्यायालयात दाद मागितली होती. आता सर्व साक्षी पुराव्यांची पडताळणी करून राजेंद्र बैलूर यांना दिलासा देताना कर्नाटक उच्च न्यायालयाने बेळगाव पोलीस प्रशासनाला येत्या 12 आठवड्यात संबंधित सर्व गुन्ह्यातून त्यांना वगळण्याचा आदेश जारी केला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तसेच न्यायालयामध्ये राजेंद्र बैलूर यांच्यावतीने काम पाहणाऱ्या ॲड. राम घोरपडे यांचेही अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta