
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला आजी-माजी लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने मराठी भाषिकातून तीव्र नाराजी पसरली आहे. समितीच्या विद्यमान नगरसेवकांनी महामेळाव्याकडे पाठ फिरविल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
आजवर समितीने सामान्य कार्यकर्त्याला ग्रामपंचायत सदस्यापासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, महानगरपालिका त्याचबरोबर आमदारकी देखील बहाल केली आहे. समितीच्या जीवावर पदे भूषविलेले बरेच आजी-माजी लोकप्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून अलिप्त रहात असून दुर्दैवाची बाब म्हणजे आजवर समितीच्या जीवावर आमदारकी भूषविलेल्या बहुतांश माजी आमदारांच्या कुटुंबियांनी लढ्याकडे पाठ फिरवली आहे.
8 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या महामेळाव्याला अगदी बोटावर मोजण्याइतके माजी महापौर, माजी उपमहापौर व माजी नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र आजवर पदे भुषविलेले बरेच माजी नगरसेवक तसेच विद्यमान नगरसेवक अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या लढ्याप्रती असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे रहात आहे. निवडणुका जवळ आल्या की समितीच्या बैठकीत तसेच आंदोलनात इच्छुकांची भाऊ गर्दी पहावयास मिळते. बऱ्याच वेळेला निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचे थवेच्या थवे बैठकींमध्ये आपली हजेरी लावीत असतात आणि निवडणुका संपल्यानंतर हेच कार्यकर्ते आंदोलने किंवा बैठकांकडे पाठ फिरवताना दिसून येतात. 8 डिसेंबर रोजी झालेल्या महामेळाव्यादरम्यान ही गोष्ट प्रकर्षाने जाणून आली. निवडणुकीची तिकिटे जाहीर करत असताना कार्यकर्त्यांच्या घोळक्यात वावरणारे नेते काल महामेळाव्यात मात्र “एकला चलो रे” अशा काहीशा परिस्थितीत दिसून आले. त्यामुळे या लोकांची निष्ठा लढ्याशी आहे की पद आणि खुर्चीशी आहे असा प्रश्न निष्ठावंत समिती कार्यकर्त्यांना पडला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती लोकेच्छा दाखविण्यासाठी निवडणुका लढवीत असते. निष्ठावंत मराठी भाषिक निस्वार्थीपणे समिती उमेदवाराला निवडून देतो परंतु सत्तेत आल्यानंतर याच लोकप्रतिनिधींना सीमा लढ्याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. सीमा लढ्यासाठी आंदोलन करताना सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उतरून लाठ्या काठ्या झेलत असताना समितीच्या नावावर पदे भोगणारे लोकप्रतिनिधी लढ्यापासून अलिप्त राहतात याची प्रचिती कालच झालेल्या महामेळाव्यादरम्यान आली. अटक व गुन्हे दाखल होण्याच्या भितीने अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी व्हॅक्सीन डेपो परिसरात फिरकणे सुद्धा पसंत केले नाही तर काहींनी दुरून टेहाळणी करणेच पसंत केले. यापुढे समिती नेतृत्वाने केवळ निवडणुका आणि पदे डोळ्यासमोर ठेवून संघटनेत कार्यरत असणाऱ्या संधीसाधूंना त्यांची योग्य ती जागा दाखवून प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्याची गरज आहे.
Belgaum Varta Belgaum Varta