
बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी भाड्याच्या इमारतीत सुरू केलेली ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ आज शिक्षण क्षेत्रातील एक गौरवशाली परंपरा ठरली आहे. या शाळेचे आणि बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे शताब्दी वर्ष २० ते २६ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. डी. व्ही. बेळवी यांच्या अध्यक्षतेखाली सहा प्रमोटर्सनी बेळगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढे १९४६ मध्ये संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. कालांतराने ही छोटी शाळा विस्तारत गेली आणि आज संस्थेअंतर्गत सात पूर्ण विकसित शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये बी.के. मॉडेल हायस्कूल (१९२५), उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल (१९६७), एन.एस. पै प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल (१९९२), वासुदेव घोटगे मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल (२००५), विठ्ठलाचार्य शिवणगी प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल (२०१०), मॉडेल सायन्स अँड कॉमर्स पी.यू. कॉलेज (२०१३) आणि श्रीदेवी दासाप्पा शानभाग मॉडेल प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल (२०१६) यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डी. व्ही. बेळवी यांनी पाटील गल्ली येथील इमारत शाळेसाठी उपलब्ध करून दिली. तसेच १.५ एकर जमीन अत्यंत वाजवी दरात संस्थेला विकली. केंद्राचे माजी गृहमंत्री आणि प्रमोटर बळवंतराव दातार यांच्या सहकार्यामुळे बेळगाव कॅन्टोनमेंट येथील ३.७५ एकर संरक्षण विभागाची जमीन संस्थेला मिळाली. देणगीदार आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे दोन्ही ठिकाणी भव्य शाळा इमारती उभारण्यात आल्या.
या संस्थांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज देशाच्या विविध भागांत आयएएस अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, पोलीस व सरकारी अधिकारी म्हणून उच्च पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आजही संस्थेतील चार शाळांमध्ये शिक्षणाचे माध्यम कन्नड आणि मराठी या स्थानिक भाषाच आहेत.
शताब्दी महोत्सवानिमित्त २० ते २६ डिसेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ५.३० वाजता विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांचा कार्यक्रम होणार आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सर्व संस्था, विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सहभागाने भव्य प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मुख्य उद्घाटन कार्यक्रम होणार असून खासदार तेजस्वी सूर्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२१ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा पुनर्मिलन सोहळा आयोजित करण्यात आला असून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त प्राचार्य बसवराज जगजंपी प्रमुख अतिथी असतील. २३ डिसेंबर रोजी शहरातील दहा नामवंत बॉडी बिल्डर्सचा बॉडीबिल्डिंग शो तसेच माजी विद्यार्थी अथणी यांचा संगीत कार्यक्रम होणार आहे. २४ डिसेंबर रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर, तर २५ डिसेंबर रोजी दिग्दर्शक व अभिनेते डॉ. गिरीश ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २६ डिसेंबर रोजी निर्माते-दिग्दर्शक नागतीहळी चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत शताब्दी महोत्सवाचा समारोप होईल.
या महोत्सवासाठी आतापर्यंत सुमारे १५०० माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दररोज सुमारे ३००० नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. खासदार जगदीश शेट्टर, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि महसूल मंत्री कृष्णा बायरेगौडा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी, सहसचिव अरविंद हुनगुंद, शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार पै, सचिव शैला चाटे, सहसचिव रवी घाटगे, मुख्याध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta