
बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे विद्या भारती कर्नाटक, बेळगाव जिल्हा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सप्तशक्ती संगम कार्यक्रम २०२५–२६ दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात भगवद्गीता जयंतीही साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पूजा व सरस्वती वंदनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. सुप्रिया पाटील व सौ. अर्पिता चिंडक होत्या. शाळेचे सचिव श्री. प्रसाद कुलकर्णी जी , श्री. रामनाथ नायक जी व मुख्याध्यापिका सौ. आरती पाटील ताई यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायाचे, तर मातांनी १२व्या अध्यायाचे सामूहिक पठण केले.
सहाय्यक शिक्षिका सौ. अमृता सिंदगी यांनी पर्यावरण व निसर्गसंरक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. सौ. जयश्री दळवी यांनी कौटुंबिक मूल्ये व सुसंस्कृत समाजनिर्मितीतील महिलांची भूमिका मांडली. तर सौ. तनुजा गावडा यांनी भारताच्या विकासात महिलांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सौ. रोहिणी पाटील यांच्या मधुर गीत सादरीकरणाने कार्यक्रमात रंग भरला. मातांसाठी सौ. सई कारेकर यांनी प्रश्नमंजुषा घेतली. तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. सुप्रिया पाटील यांनी उत्तम आरोग्यासाठी चांगल्या सवयींचे महत्त्व अधोरेखित केले तसेच भावना समजून घेणे आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी पाहुण्यांचे त्यांचा मौल्यवान वेळ व मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
मातांसाठी आयोजित दीपोत्सव स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. अनिता शिक्षिका यांनी मातांसाठी प्रतिज्ञा वाचन केले.
या कार्यक्रमास शिक्षकवृंद व मातावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व यशस्वी ठरला.
Belgaum Varta Belgaum Varta