
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर अनेक विद्यार्थिनींसोबत अनुचित वर्तन केल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, प्रकरण उघडकीस येताच पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
शाळा या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि संस्कार देणाऱ्या संस्था असाव्यात. मात्र अशा अमानवी आणि विकृत कृत्यांमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पालक, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
याहूनही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापकाला काही राजकीय पक्षांकडून अप्रत्यक्ष पाठबळ किंवा संरक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोपही समोर येत आहे. तसेच या संवेदनशील प्रकरणावर संबंधित राजकीय पक्षांनी मौन बाळगल्याने संशय अधिक बळावला आहे. सदर प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta