
बेळगाव : राजकीय फायद्यासाठी कन्नड आणि मराठी वादाचे विष न पेरता, सरकारने कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असल्याचे मत विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी व्यक्त केले.
आज विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना त्यांनी उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. नागराज यादव म्हणाले की, बेळगावचा विकास बेंगळुरूच्या धर्तीवर व्हायला हवा जेणेकरून मोठे गुंतवणूकदार इथे येतील. सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारणे, रिंग रोडची निर्मिती, नवीन विद्यापीठाची स्थापना, आलमट्टी धरणाची उंची वाढवणे आणि केपीएस शाळांची संख्या वाढवणे यावर त्यांनी भर दिला. तसेच कर्नाटक राज्य देशाला सर्वाधिक जीएसटी देते, त्यामुळे राज्याचा विकास आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे वेगाने झाली पाहिजेत. सरकारी क्षेत्रासोबतच खासगी शिक्षण संस्थांना संधी देऊन शैक्षणिक क्षेत्र अधिक विस्तारले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. बेळगावमधील कामगारांच्या समस्या, स्मार्ट सिटीची प्रलंबित कामे आणि पिण्याच्या पाण्याची योजना लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कर्नाटकच्या एकत्रीकरणासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र राज्याची मागणी करणे चुकीचे आहे. केवळ राजकारणासाठी भाषिक वादाला खतपाणी न घालता सर्वसमावेशक विकासावर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Belgaum Varta Belgaum Varta