
बेळगाव : बेळगाव येथील न्यू गुड्स शेड रोड येथील रहिवासी श्रेया नितीन भातकांडे हिने अमेरिकेत व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सकल मराठा समाज आणि किरण जाधव फाउंडेशनच्या वतीने तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
श्रेयाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेळगावच्या सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये झाले असून आरएलएस सायन्स कॉलेजमधून तिने पीयुसी विज्ञान पूर्ण केले. वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने पुणे येथील किटी हॉक अकॅडमीमध्ये डीजीसीए ग्राउंड क्लासेस पूर्ण केले. पुण्यातील शिक्षणानंतर श्रेयाने नागरी विमान वाहतूक संचालनालयाची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यानंतर दिल्ली येथून तिने आरटीआर रेडिओ टेलिफोनी रिस्ट्रिक्टेड परवाना मिळवला आणि पुढील उड्डाण प्रशिक्षणासाठी ती अमेरिकेला रवाना झाली.
फ्लोरिडा येथील एनएस एव्हिएशन इंक. फोर्ट लॉडरडेल येथे अवघ्या एका वर्षाच्या आत तिने आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करून कमर्शियल पायलट लायसन्स प्राप्त केले. बेळगाव ते पुणे, पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते अमेरिका असा प्रवास करत श्रेयाने मिळवलेले हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. या सत्कार प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta