
बेळगाव : पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना लक्ष्य करत असून राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिक लोकप्रतिनिधी सत्तेसाठी लाचार झाल्याची टीका शुभम शेळके यांनी व्यक्त केली. आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रशासन मराठी भाषिकांवर करीत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, संविधानाने दिलेला अधिकार आम्ही मागत असून पोलिसांनी आपली दुटप्पी भूमिका सोडावी अन्यथा जनक्षोभ उसळेल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांनी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले मराठी भाषेचे फलक कन्नड संघटनेकडून फाडण्यात आले. संघटनांच्या या कृतीचा विरोध करण्याऐवजी त्यांनी तात्काळ कन्नड भाषेत दुसरा फलक लावल्याने आमदार माजी आमदार यांच्या या कृतीचा शुभम शेळके यांनी तीव्र शब्दात निषेध करत संताप व्यक्त केला. याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले की, माजी आमदारांचे हे कृत्य म्हणजे मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे मराठी भाषिक म्हणून ही बाब अत्यंत शरमेची आहे. राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या मराठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मातृभाषेचा स्वाभिमान बाळगावा व आपल्या मातृभाषेसाठी एकत्र यावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या म्हणून माझ्यावर सलग दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र मराठी भाषेचे फलक फाडणाऱ्या आणि उघड उघड तोडफोड करत शहरातील शांतता भंग करणाऱ्या कन्नड संघटनांना पोलीस प्रशासनाकडून अभय देण्यात येते आणि मराठी माणसावर मात्र खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. पोलीस प्रशासनाच्या या कृतीमुळे प्रशासनाचे दुटप्पी धोरण अधोरेखित होते. पोलीस प्रशासन आणि लाल पिवळ्या संघटनेचे नेमके नाते काय? त्यांच्यात कोणते साठे लोटे आहे, असा संतप्त सवाल महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
नुकताच शहरातील कल्याणी स्वीट मार्ट येथील घटनेचा उल्लेख करताना शुभम शेळके म्हणाले की, कन्नड संघटनांचे कार्यकर्ते व पोलीस संरक्षणात शहरातील दुकानांच्या नामफलकांवर दगडफेक करत होते आणि पोलीस मात्र कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अंगरक्षकाच्या भूमिकेत होते. एकंदरीत पाहता पोलीस प्रशासन आणि कन्नड संघटनांचे कार्यकर्ते यांच्यामधील संभाषण आणि व्यवहार पाहता यांच्यात नेमके काय साठेलोटे आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. महानगरपालिका कर्मचारी बेळगाव शहरातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न देता केवळ मराठी फलकांवर काळा रंग फासण्याचे काम पोलिसांच्या मदतीने करीत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे फलक काढत असताना कन्नड संघटनांचे कार्यकर्ते देखील आघाडीवर असलेले पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हे चित्र पाहता कन्नड संघटनांचे कार्यकर्ते हे महानगरपालिकेचे बिनपगारी कामगार आहेत की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. नारायण गौडा यांनी मराठी भाषिक आणि सीमाप्रश्नाबाबत बेळगावात येऊन गरळ ओकली त्याला प्रत्युत्तर दिल्यामुळे प्रशासनाने माझ्यावर पाच लाखाचा दंड ठोठावला आणि दंड न भरल्यास मालमत्तेवर बोजा चढविण्याची नोटीस देखील दिली आहे. या दडपशाहीला न जुमानता न्यायालयात या नोटिसीला आव्हान देण्यात आले आहे. लाल पिवळ्या ध्वजाबाबत बोलताना ते म्हणाले की, कन्नड संघटनांच्या लाल पिवळ्या ध्वजाला उच्च न्यायालयाने अनाधिकृत ठरविले असून या ध्वजाला सरकारी परवानगी नाही तरीदेखील प्रशासन या संघटनांच्या गुंडगिरीला पाठिंबा देत आहे आणि मराठी माणूस संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वाभिमानाने जगत आहे तर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खटले दाखल करण्यात येतात. प्रशासनाच्या या अरेरावीला प्रतिउत्तर देण्यासाठी मराठी माणसाने स्वाभिमानाने एकत्र येण्याची वेळ आली आहे. आज मराठी माणूस आपापसात लढत राहिला तर भविष्यात या कानडी संघटनांची अन्यायाची परिसीमा गाठल्याशिवाय राहणार नाहीत. पोलीस प्रशासनाच्या या मुजोर वृत्तीला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी माणसाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे सांगत पोलीस प्रशासनाने मराठी माणसांवरील दडपशाही थांबवली नाही तर येणाऱ्या काळात मराठी माणूस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शुभम शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
Belgaum Varta Belgaum Varta