
बेळगाव : हलगा – मच्छे बायपास रस्ता तात्काळ रद्द करावा आणि शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन वाचवावी यासाठी बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधले. तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतून रस्ता करून गरीब शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असून देखील हलगा- मच्छे बायपास रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा एकदा सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमिनीतून रस्ता होऊ द्यायचा नाही असा निर्धार अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केला असून त्या पार्श्वभूमीवर हलगा -मच्छे बायपास रस्ता प्रकल्प तात्काळ रद्द करावा मागणीसाठी बेळगाव सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा रस्त्यावर आंदोलन केले.
बेळगाव आणि शहर परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी बायपास रस्त्याच्या ठिकाणी आंदोलन छेडले. “रद्द करा रद्द करा हलगा -मच्छे बायपास रद्द करा” अशा मागणीचे बॅनर घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आणि सदर रस्ता तात्काळ बंद करून शेतकऱ्यांना मिळवून द्यावा अशी मागणी करत निदर्शने केली. यावेळी सुभाष लाड, राजू मरवे, गोपाळ सोमानाचे, सुरेश मऱ्याक्काचे, शांताराम होसुरकर, सुभाष चौगुले, गुंडू भागानाचे, नितीन पैलवानाचे यांच्यासह बेळगाव शहर परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले की, 2009 पासून अल्पभूधारक शेतकरी आपली शेती वाचवण्यासाठी हा लढा देत आहेत. तिबार पीक देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून हा बेकायदेशीर रस्ता करण्यात येत आहे. हा रस्ता तात्काळ बंद करावा आणि 160 एकर जमिनीतील 1047 शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आम्ही शेतकरी करीत आहोत. हलगा- मच्छे बायपास रस्त्यात जाणारी जमीन ही टिकाऊ आणि सुपीक जमीन आहे. आमची जमीन तिबार पीक देणारी असून कायद्यानुसार सुपीक जमीन कोणत्याही विकास कामासाठी वापरता येणार नाही परंतु प्रशासन सर्व नियम पायदळी तुडवून हा बायपास रस्ता करत आहे. तेव्हा सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन हा प्रकल्प ताबडतोब रद्द करावा आणि या पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. जर देशाचा कणाच मोडला जात असेल तर देश कसा चालणार तेव्हा सरकारने तात्काळ नियम तपासून या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी वेळोवेळी यासंदर्भात आंदोलने केली आहेत. मुख्यमंत्र्यांना निवेदने दिलेली आहेत. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बेळगावचा झिरो पॉईंट प्रत्यक्षात फिश मार्केट येथे आहे. तो आता बेकायदेशीररित्या अलारवाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या ठिकाणी बदलण्यात आला आहे. 2009, 2011 आणि 2018चे एक अशा एकंदर चार गॅझेटमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ए फिश मार्केट बेळगाव मार्गे खानापूर ते गोव्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे. परंतु प्रस्ताव प्राधिकरणाने हे निर्देश डावलून बेकायदेशीररित्या हलगा-मच्छे बायपास रस्ता प्रकल्प सुरू केला आहे. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर बायपास रस्ता रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta