

बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाला काल शुक्रवारपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शताब्दी महोत्सव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सकाळी शिस्तबद्ध आणि भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. कडाक्याच्या थंडीतही या प्रभात फेरीला आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या संचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर प्रार्थनेनंतर प्रभात फेरीला सुरुवात झाली. या फेरीत बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल, एन. एस. पै प्री – प्रायमरी व प्रायमरी स्कूल, वासुदेव घोटगे मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल, विठ्ठलाचार्य शिवणगी प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल, मॉडेल सायन्स अँड कॉमर्स पी. यू. कॉलेज तसेच श्रीदेवी दासाप्पा शानभाग मॉडेल प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथील आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
अंबा भुवन, पाटील गल्ली आणि मध्यवर्ती परिसरातील प्रमुख मार्गांवरून प्रभात फेरी काढण्यात आली. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात ही फेरी पुन्हा शाळेच्या मैदानावर येऊन संपन्न झाली.
रविवारी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
शताब्दी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच रविवारी सायंकाळी ५:३० वाजता माजी विद्यार्थ्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, शाळेचे माजी विद्यार्थी व लिंगराज कॉलेजचे निवृत्त प्राचार्य बसवराज जगजंपी, माजी विद्यार्थी जयंत देशपांडे तसेच के. एल. ई. संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार प्रभाकर कोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम फक्त माजी विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असल्याचे कळविण्यात आले आहे.



Belgaum Varta Belgaum Varta