

कुद्रेमानी साहित्य संमेलन शामियानाची मुहुर्तमेढ रोपण, 28 रोजी संमेलन
बेळगाव : सीमाभागात मराठी भाषा, परंपरा, संस्कृती अडचणीत आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीमाभागातील मराठी जनता साहित्य संमेलनांचा जागर करत आहे. मराठीच्या रक्षणासाठी साहित्य संमेलने अत्यावश्यक असल्याचे मत महिपाळगड (ता. चंदगड) येथील अजित सावंत यांनी व्यक्त केले.
कुद्रेमानी येथील श्री बलभीम साहित्य संघ व गावकरी आयोजित 20 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 28 रोजी आयोजित केले आहे. संमेलन शामियानाची मुहुर्तमेढ रोपण कार्यक्रम शनिवारी कुद्रेमानी हायस्कूलच्या क्रीडांगणावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सावंत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन अर्जुन जांबोटकर होते.
सावंत पुढे म्हणाले, संस्कृतीच्या संवर्धनामध्ये भाषा ही महत्त्वाची असते. भाषा संपली तर संस्कृती संपते. संस्कृती ही अनेक वर्षांचे संचित असते. ती टिकविणे आवश्यक आहे. सध्या माहिती, तंत्रज्ञानाचा स्फोट झाला आहे. परंतु, माणसांतील संवाद कमी होत चालला आहे. नाती विरळ होत आहेत. अशा काळात साहित्य संमेलने महत्त्वाची ठरतात.
प्रारंभी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरपासून मुहुर्तमेढ दिंडीला प्रारंभ करण्यात आला. हभप जोतिबा पाटील, हभप निंगाप्पा पाटील यांनी मुहुर्तमेढचे पूजन केले. त्यानंतर गावातून टाळ, मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. हायस्कूलच्या क्रीडांगणावर मुहुर्तमेढ रोपण मंगल लोहार (मजगाव), अशिता सुतार (माजी ग्रा. पं. अध्यक्षा) यांच्याहस्ते करण्यात आले. प्रतिमांचे पूजन ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे, राजाराम राजगोळकर, वैजू गुरव, विष्णू जांबोटकर, शिवराय कांबळे, अमृत पाटील आदी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
शिक्षक सावंत काकतकर यांनी प्रास्ताविक केले. साहित्य संघाचे अध्यक्ष उमेश गुरव यांनी स्वागत केले. दीपप्रज्वलन निर्मला काकतकर, भावणा पाटील, अश्विनी जांबोटकर, भारता सुतार, रुपाली पाटील, रेणुका गुरव, उज्वला काकतकर, वर्षा पाटील आदी मान्यवरांनी केले.
यावेळी हायस्कूल सुधारणा कमिटीचे सदस्य एम. पी. गुरव, जे. एस. पाटील, एम. बी. गुरव, महादेव गुरव, गावडू गुरव, अर्जुन राजगोळकर, परशराम पाटील, दत्ता कांबळे, बाळाराम धामणेकर, मारुती पाटील, शैलेश गुरव, लखन धामणेकर, ईश्वर गुरव आदीसह साहित्य संघाचे कार्यकर्ते, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, विठू माऊली महिला हरिपाठ मंडळ, गावकरी उपस्थित होते.
सूत्रसंचालन नागेश राजगोळकर यांनी केले. आभार राजाराम राजगोळकर यांनी मानले.



Belgaum Varta Belgaum Varta