

बेळगाव : शिक्षण क्षेत्रात अनेक अमुलाग्रह बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी पदवी घेऊन नोकरी व्यवसाय करणे हे एकच ध्येय पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होते. मात्र आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काळात विद्यार्थ्यांना अनेक यशस्वी जीवन घडविण्याच्या अनेक संधी प्राप्त झालेल्या आहेत. शैक्षणिक संस्थांनाही एका साच्यातील शिक्षणाऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांवर आधारित शिक्षणांवर भर देत, देशाची सक्षम पिढी घडविण्याचे काम करावे असे आवाहन, खासदार तेजस्वी सूर्या यांनी बोलताना केले.
आज सायंकाळी बी के मॉडल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात तेजस्वी सूर्या यांच्यासह खासदार इराणच्या कडाडी, आमदार अभय पाटील, महांतेश कवठगीमठ, भारतीय रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी श्रेयस होसुर, अभिनेते आणि विचारवंत दीपक करंजीकर, उद्योजिका विद्या मुरकुंबी, अनिल पोतदार आदी मान्यवर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात पुढे बोलताना तेजस्वी सूर्या म्हणाले, कोणतीही संस्था 100 वर्ष चालविणे यासाठी विश्वासाहर्ता महत्त्वाचे असते. बी. के. मॉडेल हायस्कूल ने लोकविश्वासाच्या जोरावर शंभर वर्षाची यशस्वी वाटचाल केली आहे. आजच्या काळात मूल्यांवर आधारित भारतीय संस्कृती प्रेरीत शिक्षण महत्त्वाचे आहे. जिज्ञासा हीच शिक्षणाची खरी सुरुवात असते. जिज्ञासा संपते तिथे ज्ञानाचा ऱ्हास होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहित करावे. पालकांनी मुलांच्या परीक्षेतील गुणां ऐवजी अंगभूत कलागुणांची जोपासना करावी. पुढील पंचवीस वर्षांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून, शिक्षण संस्था, पालक आणि शिक्षकांनी सक्षम भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रीनिवास शिवणगी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



Belgaum Varta Belgaum Varta