
बेळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन पोहोचावे, या उदात्त हेतूने गेली अकरा वर्षे सातत्याने सुरू असलेल्या मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान आणि मातोश्री सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रा. सौ. छाया अरविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमाणिकर व संयोजक श्री. आर. एम. चौगुले यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्राचार्य अरविंद पाटील म्हणाले,
“विद्यार्थ्यांनो, उज्ज्वल भवितव्य सहज मिळत नाही. त्यासाठी संघर्षाला सोबतीला ठेवून, सातत्याने कामात मग्न राहा. मेहनत, शिस्त आणि चिकाटी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,”
यावेळी पुढे प्राचार्य पाटील यांनी श्री. आर. एम. चौगुले यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. म्हणाले, “श्रीयुत आर एम चौगुले यांनी कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ समाजऋणाच्या भावनेतून चौगुले सरांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक चळवळ उभी केली आहे. हे कार्य म्हणजे केवळ व्याख्यानमाला नसून, ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारे प्रेरणास्थान आहे.”
गेल्या अकरा वर्षांपासून श्री. आर. एम. चौगुले हे बेळगावातील नामवंत, अनुभवी व विषयतज्ञ शिक्षकांना ग्रामीण भागात आणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आयोजित करत आहेत. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, अनेक विद्यार्थ्यांच्या यशामागे या व्याख्यानमालेचा मोठा वाटा आहे.
ही व्याख्यानमाला महत्त्वाची ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करणे, योग्य अभ्यासदिशा देणे, परीक्षेची भीती कमी करून आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वप्न पाहण्याची जिद्द जागवणे.
या उपक्रमामागील संयोजक श्री. आर एम चौगुले मित्रमंडळही निस्वार्थ भावनेने कार्यरत असून, कोणतीही अपेक्षा न ठेवता संयोजन व नियोजनाची जबाबदारी पार पाडत असतात. त्यामुळे ही व्याख्यानमाला सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह व सकारात्मक ऊर्जा दिसून आली. “अशी व्याख्यानमाला आमच्यासाठी दिशा दाखवणारी आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. निवृत्त मुख्याध्यापक श्री. रवी तरळे श्री. रामचंद्र कुद्रेमाणिकर, श्री. अनिल हेगडे, श्री. एन. के. कलकुंद्री, श्री. शंकर सांबरेकर, श्री. सागर कटगेनायर, श्री. भरमा चौगुले, श्री. शंकर आप्पुगोळे, श्री. नागेश चौगुले, मुख्याध्यापक श्री. वाय. के. नाईक, श्रीमती नावगेकर, श्री. शिंदे, श्रीमती ओऊळकर व विज्ञान शिक्षक श्री. राक्षे यांची उपस्थिती उद्घाटन प्रसंगी लक्षणीय ठरली.
कार्यक्रमाचे नेटके सुत्रसंचालन व आभिर प्रदर्शन गुरूवर्य श्री. प्रकाश बेळगुंदकर यांनी केले…
सदर व्याख्यानमाला पुढील सलग पाच रविवार चालणार असून याचा लाभ दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन संयोजक श्री. आर एम चौगुले यांनी केले आहे.
दरम्यान, आज सी वाय पाटील यांचे मराठीचे व्याख्यान झाले.
व्याख्यानमालेचा तपशील (इयत्ता १० वी – मराठी माध्यम)
| तारीख | विषय | विषयतज्ज्ञ |
|---|---|---|
| 21/12/2025 | मराठी | सी. वाय. पाटील |
| 28/12/2025 | कन्नड | संजीव कोस्ती |
| 04/01/2026 | विज्ञान | सौ. सविता पवार |
| 11/01/2026 | सामाजिक शास्त्र | इंद्रजीत मोरे |
| 18/01/2026 | गणित | पी. आर. पाटील |
| 25/01/2026 | इंग्रजी | सुनील लाड |

Belgaum Varta Belgaum Varta