
बेळगाव : योग्य नियोजन, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्याची शिकवण याद्वारे बी.के मॉडल हायस्कूलने लाखो विद्यार्थी घडविले. या शाळेचे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे कार्यरत आहेत. या युवाशक्तीच्या जोरावरच भारत विश्वगुरू होणार आहे, असा विश्वास शिक्षणतज्ञ, कर्नाटक विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर मीना चंदावरकर यांनी बोलावून दाखवला.
बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सवाच्या आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर मीना चंदावरकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, सेंद्रिय शेतीतज्ञ के ई एन राघवन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना डॉक्टर चंदावरकर म्हणाल्या, इच्छाशक्ती कार्यशक्ती, ज्ञान शक्ती बरोबरच उत्साहाची शक्ती या शाळेच्या कार्यात दिसून येते. योग्य वातावरणातच इंद्रधनुष प्रकट होते. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी योग्य वातावरण आवश्यक असते. शिक्षणासाठी योग्य वातावरण या शाळेत आहे. शिक्षणाबरोबरच सक्षम भावी पिढी घडविण्याचे काम या शाळेच्या शिक्षक आणि संचालकांनी केले आहे.

नव्या शिक्षण नितीत मातृभाषेला महत्त्व देण्यात आले आहे.या संस्थेच्या शाळां मधून इंग्रजी बरोबरच कन्नड आणि मराठीला महत्व देण्यात आले आहे हे विशेष आहे.त्याग समर्पण आणि परिश्रमातून या शाळेच्या शिक्षकांनी संचालकांनी शतक महोत्सवी यशस्वी वाटचाल केली याबद्दल डॉक्टर चंदावरकर यांनी कौतुक व्यक्त केले. सेंद्रिय शेतीतज्ञ राघवन यांनीही यावेळी समायोजित विचार मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शुक्लांबर पत्तार यांनी स्वागत गीत गायले. श्रीनिवास शिवणगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी आभार मानले. उद्या बुधवारी सायंकाळी होणाऱ्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta