
दोन दिवस चालणार; तीन हजारांवर माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
बेळगाव : शहापूरमधील चिंतामणराव पटवर्धन हायस्कूलचा शताब्दी महोत्सव समारोप कार्यक्रम शनिवारी (दि. २७) व रविवारी (दि. २८) साजरा करण्यात येणार आहे. या शाळेत शिकलेले सुमारे तीन हजारहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार, खासदार जगदीश शेट्टर, महापौर मंगेश पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी शताब्दी महोत्सवाची सुरुवात झाली. त्याची सांगता आता होणार आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत १९५० पासून प्रत्येकी दहा वर्षाची एक बॅच तयार करण्यात येणार आहे. त्यांना स्वतंत्र वर्ग देऊन एक तास संवाद घडवून आणला जाणार आहे. सायंकाळी सहानंतर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी श्रीनिवास ठाणेदार यांच्यासह अन्य प्रमुख पाहुणे तसेच शिक्षकांचा सत्कार होणार आहे. यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने पुनर्मिलन व शाळा विकास हे ध्येय आहे. शाळेचा बहुतांश विकास झाला असून यापुढे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्ती यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मदत घेण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.
खासगीपेक्षा सरकारी शाळांचा विकास व्हायला हवा, याबाबत मी ठाम आहे. शाळांना सुविधा दिल्या तरी अद्याप म्हणावी तशी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती दिसून येत नाही, हे शल्य आहे. शिक्षकांना भरमसाठ पगार आहे. परंतु, त्यांनी स्वतःहून मुलांना तयार करण्यासाठी झटले पाहिजे. पालक, मुले व शिक्षक नेमकी कुठे कमी पडतात, याचा अभ्यास करण्यासाठी येत्या उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात शिक्षकांसाठी कार्यशाळा घेण्याचा विचार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक श्रीशैल कांबळे, शाळेचे माजी विद्यार्थी नगरसेवक गिरीश धोंगडी, भीमा दंडगल, प्रिती कामत आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta