
बेळगाव : सामाजिक बांधिलकी जपत अनाथांना मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते व माजी महापौर विजय मोरे यांनी आज अनाथ वृद्धेवर अंत्यसंस्कार करून बेळगाव मधील माणुसकीचे व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.
भाग्यनगरमधील हिंदू महिला शांताबाई गेल्या २० वर्षांपासून गांधीनगरमध्ये मुस्लिम कुटुंबाच्या घरात राहत होती, जिथे तिची आस्थेने काळजी घेतली जात होती. म्हातारपण आणि दीर्घकाळापर्यंत आजारपणामुळे तिचे बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ती महिला हिंदू होती व तिला सांभाळणारे मुस्लिम कुटुंब होते. त्यामुळे अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे असा प्रश्न होता. यावेळी इक्बाल जकती यांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते आणि माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला. माजी महापौर विजय मोरे यांनी त्या वृद्धेच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून त्या वृद्ध महिलेचा मृतदेह सदाशिव नगर स्मशानभूमीत नेण्यात आला.
ॲलन विजय मोरे, इक्बाल जकती, निसार, शमशेर, संजय कोलकार आणि सदाशिव नगर स्मशानभूमीच्या सहकार्याने, हिंदू चालीरितीनुसार अंतिमसंस्कार पार पाडले गेले.
Belgaum Varta Belgaum Varta