
बेळगाव : माझ्याकडे सगळं आहे आणि मला गुगल, एआयकडून मागतो ती माहिती मिळते. ते ज्ञान नाही हे मुलांना कळायला पाहिजे. मुलांना कळत नसेल तर पालकांनी त्यांना सांगायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी बोलताना केले.
आज सायंकाळी कॅम्प येथील बी. के. मॉडल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्याला अभिनेते गिरीश ओक यांच्यासह माजी आमदार संजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना गिरीश ओक म्हणाले, पाच ज्ञानेंद्रियांच्या ज्या गोष्टी आहेत शब्द स्पर्श रूप रस, गंध ही पाच इंद्रिय वापरता आली नाहीत तर ते सहावं इंद्रिय सुक्त होऊन जातं. एखादी कलाकृती तयार करायची असेल, ऑपरेशन करायचं असेल तर ते काम एआय स्वतःहून कधीच करू शकणार नाही. त्याच्या मागे बसलेला जो ब्रेन आहे तो सर्जन आहे. सर्जनशील कलावंत आहे तो करेल आणि तो सर्जन हळूहळू कुठे लुप्त होत जात चालला की काय असं वाटायला लागतय. आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानावर प्रमाणाबाहेरील वापरामुळे मुलांमधील जिज्ञासू वृत्ती हरवत चालली आहे. अशावेळी पालकांबरोबरच शिक्षकांची ही जबाबदारी वाढली आहे.
विद्यार्थी खूप लहान असतात,त्यांना कळत नाही. आमच्या वेळी आमचे आई-वडील सजग होते. आमच्या शिक्षकांनी आम्हाला शाळे बाहेरची बाहेरची शाळा पण दाखवली. त्यामुळेच आम्ही सर्वार्थाने घडू शकलो.
आज मी काय बोलतोय, जे काही करतोय त्याचे सर्व श्रेय मी माझ्या माझ्या आई वडिलांना आणि शिक्षकांना देतो. त्यांनी माझ्यातील चुका वेळीच दुरुस्त केल्या नसत्या तर वेगळेच काही घडले असते. आज संवादच संपलाय. आईबाप मुलांशी बोलत नाही. मुल बाहेरचे खेळच विसरली आहेत.हे प्रदूषण ते कमी व्हायला हवे असे सांगताना गिरीश ओक यांनी बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शंभर वर्षांतील कार्याचा गौरव व्यक्त केला.
माजी आमदार संजय पाटील यांनीही आपल्या तडफदार शैलीतून मनोगत व्यक्त करताना, ज्या काळी शिक्षणाबद्दल अनास्था होती त्या काळात शाळा उघडण्याची धाडस बी. के. मॉडेलच्या संस्थापकानी दाखविले. शाळेला पुढे नेण्याचे काम शिक्षक आणि कर्तबगार संचालकानी केले. या शाळेत कन्नड आणि मराठी भाषेत शिक्षण दिले जाते हे निश्चितच कौतुकाची बाब आहे. भाषा संवाद साधण्यासाठी असते. भाषा वाद घालण्यासाठी नसते. काहीजण भाषेच्या नावावर स्वतःचे दुकान चालवत आहेत. प्रत्येकामध्ये शिकण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. प्रत्येकाने चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कराव. बी. के मॉडेल शाळेने माणूस घडवण्याचे काम केले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमात मिलिंद भातकांडे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रारंभी अविनाश पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्रीनिवास शिवणगी यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta