
रामदुर्ग : पोहण्यासाठी कालव्यावर गेलेल्या दोन १० वर्षीय बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव जिल्ह्याच्या रामदुर्ग तालुक्यातील चूंचनूर गावात घडली आहे.
बसय्या सोमनवर (१०) आणि हनुमंत हगेद (१०) अशी मृत बालकांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी हे दोन्ही मित्र गावाजवळील कालव्यावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, कालव्यातील पाण्याचा प्रवाह आणि वेग अचानक वाढल्याने दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या तीव्र प्रवाहात दोन्ही मुले वाहून गेली. मुले घरी न परतल्याने आणि कालव्याच्या काठावर त्यांचे कपडे आढळल्याने ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी तातडीने शोध घेतल्यानंतर दोन्ही बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आपल्या लाडक्या लेकरांच्या मृत्यूने चूंचनूर गावात शोककळा पसरली असून पालकांनी मोठा आक्रोश केला आहे. या घटनेची नोंद कटकोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta