
बेळगाव : बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते अन्याय- अत्याचार व हत्याकांडाच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे आज बेळगावात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आणि शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्ता रोको करून बांगलादेश सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून भारताने तात्काळ बांगलादेशावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी भारत सरकारकडून बांगलादेशातील हिंदू पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा, हिंदूंची सुरक्षा व्हावी यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. यावेळी आंदोलनात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद, मुर्दाबाद बांगलादेश मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देत “हिंदू धर्म की जय, जय श्रीराम जय जय श्रीराम, देश के सन्मान मे बजरंग दल मैदान मे, धर्म के सन्मान में बजरंग दल मैदान मे” अशा आशयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी मानवी साखळी करून चन्नम्मा चौक येथे रास्ता रोको करण्यात आला आणि बांगलादेश सरकारच्या प्रतिकृतीचे दहन करून आपला संताप कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. सदर आंदोलनामुळे राणी कित्तुर चन्नम्मा चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. यावेळी कारंजी मठाचे मठाधीश परमपूज्य श्री गुरुसिद्ध स्वामीजी म्हणाले की, आपल्या शेजारी असणारे बांगलादेश हे छोटेसे राज्य पूर्वी पाकिस्तानचा भाग होता. बांगलादेश स्वतंत्र होण्यापूर्वी बंगाली मुस्लिमांवर प्रचंड अन्याय अत्याचार झाले. यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सेनेला बांगलादेशाच्या जनतेच्या रक्षणासाठी पाठवून त्या देशाचा विकासासाठी प्रयत्न केले होते. आज देखील भारत सरकार बांगलादेशाला अन्न वस्त्र सारख्या मूलभूत आवश्यक गोष्टींचा पुरवठा करून मदत करीत असते परंतु वर्षभरापासून बांगलादेशी नागरिक तेथील आमच्या हिंदू बांधवांवर अन्याय आणि अत्याचार करीत आहेत. हिंदू मंदिरांची तोडफोड केली जात आहे तेव्हा इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने धैर्य दाखविले आणि कठोर निर्णय घेतले. त्याच पद्धतीने सध्याच्या भारत सरकारने देखील कठोर पावले उचलावीत आणि तेथील हिंदु जनतेचे आणि हिंदू मंदिरांचे जतन करावे, अशी मागणी सरकारकडे श्री गुरुसिद्ध महास्वामीजींनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta