
बेळगाव : राज्यातील तब्बल २३० प्रसूती रुग्णालये बंद करण्याचा निर्णय म्हणजे असंवेदनशील व अपयशाचे प्रतिक असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या व नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. या निर्णयामुळे शासकीय रुग्णालयांवर अवलंबून असलेल्या गरीब व मध्यमवर्गीय महिलांनी प्रसूतीसाठी नेमके कुठे जावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गरिब महिलांना मूलभूत आरोग्य सुविधा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य असताना, त्या सुविधा बंद करण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय असल्याचे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षभरात प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या असून, त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार आपले अपयश झाकण्यासाठी प्रसूती रुग्णालयांनाच टाळे ठोकण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आरोग्यमंत्री डॉ. दिनेश गुंडूराव यांना उद्देशून बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, खासगी रुग्णालयांच्या लॉबीपुढे झुकून शासकीय रुग्णालये मुद्दाम दुर्बल केली जात आहेत का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. गरिब, ग्रामीण व कष्टकरी महिलांबाबत सरकारकडे संवेदनशीलता उरलेली नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पीडित महिलांचा आक्रोश आणि वाढता जनरोष लक्षात घेता, प्रसूती रुग्णालये बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली. अन्यथा या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta