
बेळगाव : बेळगाव शहरात गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, मटका अड्डे आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली आहे.
कांग्राळी येथील महादेव मंदिर परिसरात हेरॉईन विक्री करताना सीसीबी पोलिसांनी महादेव गजानन पाटील (वय २७) आणि विनायक सुब्बाराव चिन्नाळ्ळर यांना अटक केली. त्यांच्याकडून १०.१५ ग्रॅम हेरॉईन (किंमत २१,४०० रुपये), दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार हे अमली पदार्थ मुंबईतील एका महिलेकडून आणल्याची माहिती असून, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याशिवाय, खंजर गल्लीमध्ये मटका खेळवणाऱ्या हायमन हसनसाब चिक्कोडी आणि रफीक हुसेनसाब मुल्ला यांना मार्केट पोलिसांनी अटक करून रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्या जप्त केल्या आहेत. दरम्यान, रस्ते सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार २६ डिसेंबर रोजी एका दिवसात १५ तळीराम चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्व यशस्वी कारवायांसाठी पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta