
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत सुरू असलेल्या विविध रस्ते विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यामध्ये हलगा – मच्छे बायपास रस्त्यासह इतर महत्त्वाच्या महामार्ग कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत बायपास रस्त्याच्या भूसंपादनाची स्थिती, सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती, तांत्रिक अडचणी आणि अडथळ्यांवर चर्चा झाली. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा बायपास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद करत विभागांमध्ये समन्वय साधून अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.
काही ठिकाणी कामांना होत असलेल्या विलंबाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भूसंपादन, विद्युत खांब, पाणी पाइपलाइन व दूरसंचार वाहिन्यांचे स्थलांतर यासंदर्भातही स्पष्ट सूचना देण्यात आल्या. रस्ते कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, तसेच कामे ठरलेल्या मानकांनुसार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी योग्य वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पोलिस विभाग तसेच कंत्राटदारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta