
बेळगाव : शहरातील हट्टीहोळी गल्ली परिसरात अनोळखींनी दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शनिवारी मध्यरात्री सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले असून, या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हट्टीहोळी गल्लीतील एका निवासी भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही दुचाकींना अनोळखींनी पेट्रोल किंवा ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. काही वेळातच दुचाकींनी पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक दुचाकी पूर्णपणे पेटली. अन्यतीन दुचाकींचा काही भाग जळाला आहे. आगीमुळे संबंधित दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र लक्षणीय असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी रविवारी घटनास्थळी भेट दिली. भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.
वारंवार अशा घटनांमुळे परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta