
बेळगाव : बेळगावमध्ये सीमावर्ती मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र भवन’ उभारणीच्या हालचालींना कर्नाटक रक्षण वेदिकेने पुन्हा आडकाठी करत थयथयाट सुरु केला आहे.
महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या प्रयत्नांमुळे भाषिक सलोखा बिघडेल, असा दावा करत वेदिकेने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत या भवनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून बेळगावातील मराठी भाषिकांकडून हक्काच्या सांस्कृतिक केंद्राची मागणी केली जात आहे. मात्र, याला विरोध करत, सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचे पाऊल उचलणे चुकीचे आहे. या भवनाच्या नावाखाली पुन्हा एकदा भाषिक वादाचे विष पेरले जात असल्याचा बिनबुडाचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रस्तावित भवनासाठी कोणतीही जमीन किंवा बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये, असा पवित्रा कर्नाटक रक्षण वेदिकेने घेतला आहे. केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि सीमावादाला हवा देण्यासाठीच हा नवीन डाव रचला गेल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी बोलताना भूपाळ अत्तु यांनी महाराष्ट्र भवनाच्या उभारणीवरून आक्षेप घेत सीमाभागात अशा प्रकारच्या वास्तू उभारल्यास त्याचा शांततेवर परिणाम होईल, असा जावईशोध लावला आहे.कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने प्रशासनावर पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असून याबाबत करवेने निवेदन देखील सादर केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta