
विद्यार्थ्यांनी शिस्त आणि जिद्द जोपासावी : मान्यवरांचे प्रतिपादन; आदर्श विद्यार्थ्यांचा गौरव
बेळगाव : विश्व भारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य पातळीवर यश मिळवलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.
गणेशपूजन व दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश मूर्ती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रियांका एच. हिने स्वागत नृत्य सादर केले, तर समीक्षा आणि संचाने ईशस्तवन सादर केले. विश्व भारत सेवा समितीचे सचिव श्री. प्रकाश नंदिहळी यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले. एम. एच. पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. स्मिता मुतगेकर यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.
यशस्वी होण्यासाठी शिस्त आवश्यक : श्रीमती सुषमा पाटील
प्रमुख पाहुण्या श्रीमती सुषमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिस्त ही यशाची पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य आणि शिस्त ठेवली तरच भविष्यात प्रगती होईल.” यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सदानंद धोंगंडी यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व सांगून करिअरच्या विविध संधींची माहिती दिली.
सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच विजय : डॉ. डी. एन. मिसाळे
प्रमुख वक्ते डॉ. डी. एन. मिसाळे यांनी “खरा विद्यार्थी तोच असतो ज्याला पराभव आणि विजय यातील फरक समजतो,” असे सांगत युवाशक्ती हेच देशाचे खरे प्रतिनिधित्व असल्याचे स्पष्ट केले.
आदर्श विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव
याप्रसंगी कला विभागातून सर्वेश मोहिते व भव्या इलिगार, तर वाणिज्य विभागातून प्रणव कदम व यशोदा कणबरकर यांना ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून गौरविण्यात आले. शुभम गावडे याला आदर्श खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळात नाव उज्वल करणाऱ्या शुभम कांबळे, प्रणव गडकरी, सुशांत पाटील आणि राजविर बिर्जे यांचाही सत्कार करण्यात आला. विजया डिचोलकर यांनी पारितोषक वितरणाचे वाचन केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले. तसेच सिव्हिल इंजिनिअर कुणाल हत्तलगे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप
विश्वभारत सेवा समितीचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. एफ. कटांबळे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला राऊंड टेबल क्लबचे सदस्य श्री. आयुष दालमिया, श्री. कार्तिक मिस्कीम, उचगाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बाळू देसुरकर, पत्रकार श्रीकांत काकतीकर, राजू हळब, के आर अष्टेकर, देवकुमार मंगणाकर, धनश्री गाढे, सुरज हत्तलगे, गौतम कोकणे, लग्नेश खोत, अर्चना नांद्रे आणि सुनंदा मुलीमनी यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर नागेनहट्टी आणि रेणुका चलवेटकर यांनी केले, तर एम. एस. चलवादी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta