
बेळगाव : बेळगाव शहरात प्रस्तावित असलेल्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी ६ जानेवारी रोजी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विविध संघटना आणि नागरिकांची मते जाणून घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात विशेष बैठक पार पडली. बेळगाव शहरातील उड्डाणपुलाच्या उभारणीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी उत्तर आणि दक्षिण मतदारसंघांमध्ये योग्य जागेचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.राज्य सरकारने या उड्डाणपुलासाठी २७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत जोडला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग ते राणी चन्नम्मा चौक, दुसऱ्या टप्प्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्याल्वे गेटपर्यंत या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. ६ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत संघटना आणि जनतेची मते लक्षात घेऊन पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील तुरमुरी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच जागा निश्चित करून त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला जाईल. बैठकीत पालकमंत्र्यांनी स्मार्ट सिटी, बुडा आणि हेस्कॉम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रलंबित विकासकामांचा आढावा घेतला. पूर्ण झालेले प्रकल्प संबंधित विभागांकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कचरा डेपोसाठी योग्य जागा मिळाल्यास शहराचा स्वच्छता प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या बैठकीला आमदार राजू सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी डॉ. भानुदास प्रकाश यांची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta