बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या 80 टक्के पेक्षा जास्त घरपट्टी वसुली करण्यात यश आले असून तब्बल 44 कोटी 16 लाख रुपये इतकी घरपट्टी वसूल करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वाधिक घरपट्टी वसुली आहे.
कोरोना लॉकडाऊनची समस्या गेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात देखील होती. याशिवाय बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानपरिषद निवडणूक झाली. आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिल महिन्यात लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्यात महसूल कर्मचारी व्यस्त झाले.
27 एप्रिलपासून बेळगावात लॉकडाऊन सुरू झाला तो 24 जून पर्यंत अंमलात होता. त्यामुळे दोन महिने घरपट्टी वसुली झालीच नाही. घरपट्टीवरील 5 टक्के सवलत ही तब्बल 5 महिने देण्यात आली होती. पुन्हा जानेवारी 2022 मध्ये कोरोनाची तिसरी लाट आली एवढ्या समस्या असूनही महसूल विभागाने यंदा सर्वाधिक घरपट्टी वसूल केली आहे.
महापालिकेच्या महसूल विभागाला 2021 -22 या आर्थिक वर्षात 50 कोटी रुपये घरपट्टी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तथापि लाॅकडाऊनमुळे पहिल्या तीन महिन्यात घरपट्टी वसुली झालीच नाही. शहरातील मालमत्ताधारक ज्या बेळगाव वन केंद्रात घरपट्टी भरतात या केंद्राचे कामकाज ही लॉकडाऊन काळात पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये नव्याने रुजू झालेले मनपा आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी घरपट्टी वसुलीचे 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश महसूल विभागाला दिला होता.
तथापि डिसेंबर महिन्यात बेळगावात विधिमंडळ अधिवेशन झाल्यामुळे महसूल कर्मचारी त्यात व्यस्त झाले आणि उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. जानेवारीपासून पुन्हा वसुली मोहिमेला वेग आला. त्याचप्रमाणे घरपट्टी न भरलेल्या मोठ्यात कंत्राटदारांची यादी तयार करून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्यामुळे वसुलीचे प्रमाण वाढले.
Check Also
मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश
Spread the love बेळगाव : 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगाव यांच्या वतीने …