
बेळगाव : उद्योजक, व्यापाऱ्यांसह सर्वांचीच मोठी गैरसोय होत असल्यामुळे बेळगाव विमानतळाच्या पूर्वी असलेल्या 13 विमान सेवा ज्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या त्या ताबडतोब पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स कौन्सिल आणि द बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनने बेळगाव विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन यांच्याकडे केली आहे.
बेळगावच्या विमान सेवांमध्ये अलीकडच्या काळात मोठी घट झाली असून काही सेवा पूर्णत: बंद झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव ट्रेडर्स कौन्सिल आणि द बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन यांच्या आज शुक्रवारी दुपारी सांबरा, बेळगाव येथील विमानतळ संचालक एस. त्यागराजन यांच्याशी झालेल्या बैठकीप्रसंगी उपरोक्त मागणी करण्यात आली. यावेळी व्यापार, उद्योग वाणिज्य तसेच सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या उच्च क्षमतेच्या व महत्त्वाच्या शहरांशी असलेल्या विमानसेवांमध्ये झालेली कपात बेळगाव आणि परिसराच्या आर्थिक तसेच व्यापार व औद्योगिक प्रगतीला खिळ घालणारी ठरत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
विमान संपर्कात घट होत असल्यामुळे प्रादेशिक विकास प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाला असून व्यापार वृद्धीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. विमानसेवा पूर्ववत सुरू करणे, नव्या मार्गांचा समावेश करणे, विमानतळाच्या संभाव्य क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या संदर्भात पंतप्रधान कार्यालय आणि विमान उड्डाण मंत्रालयाला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सतीश तेंडुलकर (अध्यक्ष – बीसीएमए व ट्रेडर्स फोरम), मुकेश खोढा (सचिव – बीसीएमए), मुकेश संघवी, नितेश जैन, राजू पालीवाला, लालचंद छापरू, सुभाष पाटील (वरिष्ठ तांत्रिक अधीक्षक) आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta