बेळगाव : केंद्रीय जीएसटी बेळगाव आयुक्तालयाने 2021-22 या आर्थिक वर्षात 10172 कोटी रुपये इतके विक्रमी जीएसटी संकलन केले आहे अशी माहिती बेळगावचे जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी दिली आहे.
एका प्रसिद्धी पत्रकात जीएसटी उप आयुक्त अजिंक्य हरी काटकर यांनी म्हटले आहे की, इतके विक्रमी जीएसटी कर संकलन हे अर्थचक्र बळकट झाल्याचा संकेत आहे. देशाचा सांसर्गिक रोगाचा धोका दूर होत असल्याचे हे लक्षण आहे. बेळगाव जीएसटी आयुक्तालयाचा विस्तार मोठा आहे. यात बेळगावसह धरवडम गदग, कोप्पळ, विजयनगर, बळ्ळारी, रायचूर, यादगिरी, कलबुर्गी, बिदर, विजापूर आणि बागलकोटसह उत्तर कर्नाटकातील 12 जिल्ह्यांचा समावेश होतो. विक्रमी जीएसटी विवरणपत्र दाखल करण्यात आली असून, आर्थिक घडामोडीना वेग आल्याचे हे निदर्शक आहे. या भागातील जनतेमधील उद्योजकतेला वाव मिळत असल्याचे यावरून दिसून येते. या जिल्ह्यांत एकूण 2,30,566 करदात्यांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी केली आहे. राज्य आणि केंद्र जीएसटी अधिकारी त्यांची पडताळणी करत आहेत. केंद्रीय जीएसटी विभागात नोंदवलेल्या करदात्यांकडून बेळगाव जीएसटी विभागात 10,172 कोटी रुपये इतका विक्रमी जीएसटी जमा झाला आहे असे त्यांनी सांगितले.
