बेळगाव : बेळगाव शहरात प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व रिक्षांना येत्या दोन महिन्यांच्या आत मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रिक्षाचालक आणि संबंधित विभागांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीत शहरातील वाढती प्रवासी तक्रार आणि भाडेवाढीच्या अनियमिततेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या बेळगाव शहरात सुमारे ११ हजार रिक्षा कार्यरत असून, सर्व रिक्षांनी मीटरनुसारच प्रवास करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले.
उद्यापासून मीटर बसवण्याची प्रक्रिया गतीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दरमहा किमान ३ हजार रिक्षांना मीटर बसवून त्यावर प्रशासनाचे अधिकृत स्टिकर लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी मीटर बसवण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती, मात्र अद्याप अनेक रिक्षांनी नियमांचे पालन केलेले नसल्याने आता उर्वरित सर्व रिक्षांनी दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
या बैठकीला पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मीटर सक्तीमुळे प्रवाशांची होणारी आर्थिक फसवणूक थांबेल आणि रिक्षा सेवेत पारदर्शकता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta