बेळगाव : मराठी नामफलक फाडणाऱ्या कन्नड संघटनांना वेळीच आवर घालण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना शेवटचे निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आज घेण्यात आला.
17 जानेवारी हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी मराठा मंदिर ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा असे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर बेळगावात मराठी फलकांवर वक्रदृष्टी टाकणाऱ्या कानडी संघटनांवर प्रशासनाने अंकुश ठेवावा यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्तीच्या बैठकीत घेण्यात आला. निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून कन्नड संघटनांवर कारवाई न झाल्यास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येईल व यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देखील या बैठकीत देण्यात आला.
बैठकीत बोलताना नेत्यांनी सांगितले की, पूर्वी मराठी भाषेसाठी काढण्यात आलेल्या डांबर मोर्चाच्या धर्तीवर मराठी फलकांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर मोर्चाची तारीख निश्चित केली जाईल. त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाला आंदोलनाबाबत सूचित करण्यात येणार आहे.
कन्नड संघटनांचे मोजके कार्यकर्ते पोलिस संरक्षणात शहरात गोंधळ घालत असल्याचा आरोप करत, मराठी भाषिकांनी कोणतीही कारवाई झाली तरी शांततापूर्ण पण ठाम भूमिका ठेवत माघार घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले. पक्षभेद विसरून सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठी भाषा व अस्मितेसाठी संघटितपणे काम करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
बैठकीदरम्यान प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, वसंत नावलकर, मनोहर हुंदरे, राजाराम देसाई, अनिल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. बैठकीस रणजीत चव्हाण-पाटील, अॅड. एम. जी. पाटील, बी. ओ. येतोजी, मल्लाप्पा गुरव, गोपाळ पाटील, रावजी पाटील, विकास कलघटगी, विलास बेळगावकर, पांडुरंग सावंत, अजित पाटील, बी. डी. मोहनगेकर, मोनाप्पा पाटील, जयराम देसाई, मोनाप्पा संताजी, राजू मरवे, रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta