
बेळगाव : केएलई सोसायटीच्या लिंगराज महाविद्यालयात 165 वी दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक त्यागवीर लिंगराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. त्यागवीर शिरसंगी नरेश लिंगराज यांची एक दूरदर्शी राजा आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून दरवर्षी जयंती साजरी करण्यात येते. या समारोहाला श्री. विरक्तमठ शेगुणसीचे परमपूज्य डॉ. महांतप्रभू स्वामीजी यांची, दिव्य उपस्थिती होती. यल्लापूर येथील विश्वदर्शन पदवीपूर्व महाविद्यालयचे प्राचार्य प्रमुख पाहुणे डॉ. डी. के. गांवकर म्हणून लाभले. व्यासपीठावर लिंगराज जयंती समितीचे अध्यक्ष आणि केएलई सोसायटी बेळगावचे उपाध्यक्ष श्री.बसवराज तटवटी, बैलहोंगलचे आमदार आणि केएलई सोसायटीचे अध्यक्ष श्री. महांतेश कौजलगी, बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एस. मेलिनमनी आणि लिंगराज जयंती समितीचे सचिव आणि कन्नड विभाग अध्यक्ष डॉ. एच.एम. चन्नापगोळ उपस्थित होते. या समारोहाचे अध्यक्षस्थान लिंगराज जयंती समितीचे अध्यक्ष आणि केएलई सोसायटी बेळगावचे उपाध्यक्ष श्री. बसवराज तटवटी यांनी भूषवले.
यावेळी विश्वदर्शन पदवीपूर्व महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. डी. के. गांवकर म्हणाले की, त्यागवीर लिंगराज सामान्य व्यक्ती म्हणून जन्मले. ते एक असाधारण व्यक्ती म्हणून जगासाठी प्रेरणास्त्रोत बनले. म्हणून, मला वाटते की ही जयंती साजरी करणे एक अर्थपूर्ण क्षण आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक लिंगराज यांना समजले होते की जर या देशातील लोक शिक्षित झाले तर त्यांचे जीवन गौरवशाली होईल. आमच्यासाठी ते एक आदर्श आहेत. त्यांचे जीवन म्हणजे ती एक सुंदर कविता आहे.
श्री. विरक्तमठ शेगुणसीचे परमपूज्य डॉ. महांतप्रभू स्वामीजी म्हणाले की, त्यागवीर लिंगराज यांनी शिक्षणासाठी दान देवून समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे दान आजही अजरामर आहे. सन 1933 मध्ये या ऋषींच्या महादानामुळे पहिले लिंगराज पदवी महाविद्यालय स्थापन झाले. त्यागवीर लिंगराज यांचा आदर्श समाजातील प्रत्येकाने घेतला पाहिजे.
या उत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे एनसीसी, एनएसएस आणि युथ रेडक्रॉस यांनी आयोजित केलेला रक्तदान मोहीमे अंतर्गत केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगाव यांच्या सहकार्याने 45 युनिट रक्त गोळा करण्यात आले. या उपक्रमातून त्यागवीर लिंगराज यांनी दाखवलेल्या दानशूरतेचे उदाहरण देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात त्यागवीर लिंगराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. केएलई सोसायटी बेळगावचे अध्यक्ष श्री. महांतेश कौजलगी यांनी या समारोहाचे प्रास्तविक केले. कु. रोहिणी हनरबट्टी हिने प्रार्थना गीत गायले. तसेच या जयंती समारोहास प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश गुरुणगौडर आणि प्रा.सिद्दनगौडा पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन कन्नड विभाग अध्यक्ष डॉ. एच. एम. चन्नापगोळ यांनी केले. या समारोहात लिंगराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांच्या विजेत्यांना या समारोहात बक्षीस वितरण करण्यात आले. या समारोहामध्ये अंध महेश्वरी शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भक्तिगीत गायले. आणि वंदे मातरम ह्या राष्ट्रगानाने समारोहाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta