




बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी या गावात 1 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चातून विविध देवस्थान जीर्णोद्धार कामकाजाचा भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते नुकताच पार पडला.
मंडोळी गावात असलेल्या पुरातन देवस्थानांच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील भाजप सरकारप्रमाणेच ग्रामीण भागाच्या विकासाचा पण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतला आहे. भाजप आमदारांहून अधिक निधी मंजूर करून घेत आम लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंडोळी गावातील मारुती मंदिर, कलमेश्वर मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. गुढीपाडव्यानिमित्त कामकाजाचा भूमिपूजन समारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
भूमिपूजनानंतर बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ग्रामीण भाग राज्यभरात अद्यापही पिछाडीवर आहे. मी आमदार झाल्यानंतर अनेक योजना, विकासकामे हाती घेतली आहेत. राजहंसगडावर छत्रपती शिवरायांची भव्य मूर्ती निर्माण करण्यात येणार असून आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत या मूर्तीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात अजूनही अनेक विकास कामे करायची शिल्लक असून यासाठी आपल्या सार्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.


यानंतर आम. चन्नराज हट्टीहोळी बोलताना म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून ग्रामीण भागात अनेक विकासकामे झाली आहेत. परंतु काही जण हातात माईक घेऊन विनाकारण अपप्रचार करताना दिसून येत असून याकडे जनतेने दुर्लक्ष करून विकासाची साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
युथ काँग्रेस जिल्हाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर बोलताना म्हणाले, मीही सुरुवातीपासून हिंदुत्वाशीच निगडित आहे. हिंदुत्व सोडून आपण कुठेही गेलो नाही. मराठी भागात आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांनी अनेक विकासकामे केली असून पुढील काळात देखील काँग्रेस सत्तेवर आल्यास अधिक विकासकामे हाती घेतली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभास उपस्थित असलेले माजी टीडीबी सदस्य डी. एल. आंबेवाडीकर, अभियंते कल्लेश मुतकेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडले. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, नारायण मालकाप्पा फगरे, आधार सोसायटीचे संचालक कृष्णा शहापूरकर, कृष्णा गोडसे, कंत्राटदार शिवाजी चलवेटकर, पीकेपीएस संचालक नारायण कंग्राळकर तसेच इतर मान्यवर, देवस्थान जीर्णोद्धार कमिटी सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta